डोळे उघडून बघा गड्यांनो...
“आरक्षण” हा शब्द आपण पुस्तकांत वाचतो, चर्चांमध्ये ऐकतो, वादविवादात मांडतो…
पण कधी त्या शब्दामागचं खरं आयुष्य पाहिलंय का?
९वीत ‘आरक्षणाचे भविष्यवेध’ हा प्रकल्प करताना आम्ही आकडे, धोरणं आणि कल्पना समजून घेत होतो…
पण एक प्रश्न सतत मनात येत होता,
हे सगळं ज्या लोकांसाठी आहे, त्यांचं खरं जगणं नक्की कसं असेल?
ह्या एका प्रश्नाने आम्हाला कागदांच्या, पुस्तकांच्या आणि विचारांच्या बाहेर काढलं…
आणि नेलं अंबाजोगाईच्या त्या वस्त्यांमध्ये,
जिथे उत्तरं तर मिळाली,
पण सोबत जास्त अस्वस्थ करणारे प्रश्न सुद्धा…
“आरक्षण हवं का नाही?” ह्यावर वाद होऊ शकतो…
पण
“आरक्षण का निर्माण झालं?”
हा प्रश्न समजून घ्यायचा असेल,
तर तुम्हाला त्या लोकांच्या आयुष्यात पाऊल ठेवावंच लागतं.
प्रकल्प परिक्षणाच्या वेळी श्रीनिवास देसाई सरांनी एक अट घातलेली. "मला तुमचा प्रकल्प आवडलाय. मी तुला १०० गुण द्यायला तयार आहे, फक्त अट एकच. तुम्ही तिघींनी मिळून हा समाजप्रश्न प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी काहीतरी अनुभव घ्यायचा."
तेव्हापासूनच, सुमित दादा, मुकुलिका ताई, हृषिकेश दादा ह्यांच्याशी हा अनुभव कसा घ्यायचा ह्याबद्दल नियोजन सुरू झालं. मध्ये १०वी आली आणि हे नियोजन जरा मागे पडलं.
पण १०वी संपताच, आम्ही,
ज्ञान प्रबोधिनी प्रशालेतल्या,
अनुष्का लडकत, तन्वी मुंढे, शर्वरी मुळूक, स्वराली घाडगे, वैदेही बगाटे आणि ज्ञान प्रबोधिनी, अंबाजोगाई मधील वेदिका कदम अशा सर्वांनी १ दिवस यशस्वीरित्या हा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
आरक्षण ह्या समाजप्रश्नाला प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी आम्ही काही मुली, ज्ञान प्रबोधिनी, अंबाजोगाई इथे जाऊन आलो.
उद्या जायचे आहे पण आपण अजून कोणाला संपर्क केला नाही असा असताना थेट प्रसाद दादा चिकसे ह्यांना call करूया असं ठरलं. आणि प्रसाद दादा आमच्या पेक्षा जास्त उत्साही वाटायला लागले! त्यांनी मिलिंद सरांना सुद्धा call मध्ये add केलं. आपण जिथे चाललो आहोत तिथले पहिले शिबिर सरांनी घेतले आहे हे समजल्यावर अजून कुतूहल वाटायला लागलं.
दादांच्या घरी गेल्यानंतर पूजा, सुनीता ह्यांची भेट झाली. इतक्या समस्यांना सामोरे जाऊन सुद्धा त्यांची जिद्द कणभर सुद्धा खचली नव्हती हे नवल वाटलं. दादांच्या एका कॉल नंतर समोरचा माणूस ५व्या मिनिटाला दादांसमोर येऊन उभा राहतो, ह्यातून दादांप्रती असलेला आदर तर दिसलाच परंतु प्रेम सुद्धा तेवढ्याच ठळकपणे दिसलं. दादांनी किती काम केलंय हे तर त्यांच्यासोबत गप्पा मारून समजलंच पण ते किती मनापासून केलंय हे जास्त भावलं.
पुढे अंबाजोगाईतल्या मंदिराला भेट दिली. अभिजित दादा जोंधळे ह्याच्या घरी किंवा अनुराग पुस्तकालयाला भेट दिली. दादासोबत खूप गप्पा झाल्या. कोणत्याप्रकरची पुस्तकं वाचायला हवी अशी चर्चा झाली. सोबत ओळखितली एक अंबाजोगाई मधली मैत्रीण १०विचा पेपर लिहून आली होती.
आता आम्ही सर्वजण एकत्र, काही जण प्रसाद दादांच्या गाडीमधून असं वस्तिभेटीला निघालो. दादांचं येण्याचं चिन्ह म्हणजे जोरात horn वाजवणे. त्यानंतर बघितलेलं दृश्य डोळ्यासमोरून कधीच जाणार नाही हे नक्की.
सुरुवातीला ३,४ हळू हळू ६,९,१२,१५ अशी मुलं येत गेली. काही गाडीवर चढली, काही दरवाज्यावर लटकली आणि त्यांचे चेहरे खूप हसरे झाले. दादांचं आगमन जणू त्यांच्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण.
एकत्र नमस्ते झालं, शुभंकरोती म्हणलो, आणि ही वस्ती शिखांची असल्यामुळे एकत्र इक् ओंकार म्हणालो. मुलांनी आमचे स्वागत केले. १,२,३ फूलं फूलं फूलं. मग एकमेकांच्या ओळखी झाल्या. नंतर एक मुलगी/मुलगा आणि आमच्यातलं एक जण असं आम्ही त्यांच्या घरी गेलो.
घरातल्यांसोबत खूप गहन चर्चा झाल्या असं म्हणायला हरकत नाही.
आम्ही आम्हाला येत असलेला पंजाबी गाणं त्यांना ऐकवलं. त्यांना खूप आनंद झाला हे आम्हाला समजत होतं. आजींसोबत गप्पा सुरू असतानाच विषय 'विचारांचा'.
आज्जी म्हणाल्या, "मी तुला माझी नात समजून हे सांगते. गाणी ऐकायची, इतर गोष्टी समजून घ्यायच्याच पण त्यात भरकटून न जाता, ते आपलेच विचार मानून न घेता, स्वतःचा स्वतः विचार करायचा आणि त्यांना धरून पुढे चालायचं".
नंतर का कोणाच ठाऊक पण अज्जींना हे सुद्धा सांगावसं वाटलं की "माझे कपडे, राहणीमान ह्याला तुम्ही दुर्लक्षित करा, आम्ही आतून खूप निर्मळ आहोत."
हे काही शब्द माझ्यात कायमचं घर करून बसणार आहेत हे तेव्हाच मला कळलं होतं.
तिथून निरोप घेऊन पुढच्या वस्तीला भेट दिली. जिथे एका व्यक्तीला पाय पसरून झोपायला जागा नाही, तिथे ९ लोकं सुद्धा राहू शकतात हे पाहिल्यावर आपल्याला असलेल्या तक्रारी किती शुल्लक असतात ह्याची जाणीव झाली.
पुढच्या वस्ती मध्ये स्त्रिया अंबाजोगाई मधलं plastic उचलण्याचा काम करीत. तिथली एक लहानमुलगी पाण्यानी भरलेली घागर घेऊन चालली होती. दादांनी आम्हाला challenge दिलं हे करून दाखवण्याचं. गावाकडे राहणं होत असल्यामुळे मला ते जमलं. पण, जेव्हा हे समजलं की ती छोटी मुलगी ह्या अश्या घागरी दिवसातून १७ वेळा उचलते, तेव्हा मनापासून वाईट वाटलं.
आणि हे एवढं सगळं असून सुद्धा, त्यांना विचारलं तुला मोठं होऊन काय बनायचंय तर जिद्दीने भरलेल्या डोळ्यांनी ते सांगतात "doctor", न कोणत्या प्रकारची तक्रार करता त्या घरात राहतात.
आपण भविष्याची चिंता करण्यात व्यस्त आहोत पण ही लोकं अजूनही भूतकाळातच जगत नाहीत का? ही चिंता सुद्धा तेवढीच महत्त्वाची नाही का? आपल्याला असलेल्या समस्या, प्रश्न ह्यांच्या आनंदासमोर काहीच नाहीत, नाही का...?
त्या दिवशी आम्ही वस्तीतून बाहेर पडलो…
पण खरं सांगायचं तर,
ती वस्ती अजूनही आमच्यातून बाहेर पडलेली नाही.
कारण तिथे आम्ही फक्त परिस्थिती पाहिली नाही तर, मनं पाहिली. अडचणींनी वेढलेली, पण तक्रारींनी नाही…
स्वप्नांनी भरलेली, पण अपेक्षांनी नाही.
आणि तेव्हाच जाणवलं,
आपण भविष्याच्या भीतीत इतके अडकून गेलोय,
की कोणाचं वर्तमान किती कठीण आहे,
हे पाहायलाच विसरलोय.
कदाचित प्रश्न आरक्षणाचा नाहीच…
प्रश्न आहे..
आपण खरंच “समाज” म्हणून जगतोय का,
की फक्त आपापल्या सोयीच्या चौकटीत अडकलोय?
कारण शेवटी,
त्यांच्याकडे कमी आहे… पण ते हसतायत.
आपल्याकडे सगळं आहे… पण आपण नेहमी काहीतरी अजून शोधतोय.
मग खरंच…
आपण डोळे उघडून बघण्यात चुकलो का?
गरज परिस्थिती बदलायची आहे,
की आपल्या नजरेची?
Comments
Post a Comment